बचत आणि गुंतवणूक यामधील मूलभूत फरक - Saving & Investment - 01
बचत आणि गुंतवणूक यामधील मूलभूत फरक… मागील पोस्ट मध्ये आपण बचतीचे महत्व बघितले, ह्या पोस्ट मध्ये ह्यातील मूलभूत फरक समजून घेऊ.
SAVINGS vs INVESTMENT
बचत आणि गुंतवणूक हे शब्द व्यवहारात वापरताना आपण बहुधा नेहमीच गल्लत करीत असतो. दोन्ही जणू एकच आहेत अशा समजुतीने बचत आणि गुंतवणुकीचा उल्लेख केला जातो. खरे तर, बचत आणि गुंतवणूक या वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि त्यामध्ये मोठा फरक आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे.
बचत - SAVINGS
बचत अर्थात 'सेव्हिंग' म्हणजे आपल्याजवळ असलेले पैसे अशा साधनांत (इन्स्ट्रुमेन्ट्स') ठेवणे जी कमी जोखमीची असतील आणि त्यांच्या सुरक्षिततेबाबत बव्हंशी खात्रीच असते. एवढेच नव्हे, बचत त्यालाच म्हणता येईल जेथे ठेवलेले आपले पैसे अगदी कमीत कमी वेळेत सूचना देऊन हवे तेव्हा काढून घेता येतील.
- आत्ताच्या घडीला आपल्या वापरात नसलेली ठराविक रक्कम ही आपत्कालीन स्थितीसाठी किंवा भविष्यातील खर्चासाठी बाजूला काढून ठेवणे म्हणजेच बचत होय.
- हा असा पैसा आहे, जो तुम्हाला ठराविक वेळी अगदी सहजगत्या उपलब्ध झाला पाहिजे. त्यात कोणतीही जोखीम असू नये आणि त्याच्यावर कमीत कमी कर लागू असावा.
- आर्थिक संस्था आपल्याला बचतीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून देतात. त्याच्यामध्ये निरनिराळ्या सरकारी बचत योजना आणि इतर पर्यायांचा समावेश आहे. आर्थिक मंदीचा काळ पाहिलेले अनेक गुंतवणूकदार सुद्धा आपत्कालीन स्थिती साठी म्हणून काही प्रमाणामध्ये पैसे बाजूला काढून ठेवण्याचा सल्ला देतात.
गुंतवणूक - INVESTING
गुंतवणूक ( इन्व्हेस्टिंग) मात्र बचतीपेक्षा खूपच वेगळी आहे. आपल्या गुंतविलेल्या पैशांवर जास्तीत उत्पन्न ('रिटर्न्स') मिळावेत ही गुंतवणूकदाराची अपेक्षा असते.
गुंतवणूक म्हणजे पैसे किंवा संपत्ती वापरून अशा मालमत्ता (Assets) विकत घेणे, ज्यामध्ये तुमच्या अभ्यासानुसार एक सुरक्षित आणि ठराविक दराने परताव्याची संभावना सर्वाधिक आहे. जेणेकरून आर्थिक मंदी किंवा आर्थिक अडचणीच्या काळात सुद्धा आपल्याकडे पैशाचा एक अविरत प्रवाह सुरू राहील.
व्यावहारिक भाषेत अशा चांगल्या पर्यायांना प्रॉडक्टिव असेट्स असे म्हणतात, ज्यामध्ये समभाग, बॉण्ड, म्युच्युअल फंड आणि स्थावर मालमत्तेचा समावेश होतो.
उदाहरणार्थ, एखादा बँक ठेवीदार आपल्या बचत खात्यात ठेवलेल्या रकमेतील काही रक्कम एखाद्या म्युच्युअल फंडाच्या योजनेत अधिक 'रिटर्न्स' च्या अपेक्षेने गुंतवील. गेल्या वर्षभरात म्युच्युअल फंडांच्या काही 'लिक्विड फन्डा'नी गुंतवणुकीवर ७ ते ८ टक्के 'रिटर्न्स' दिले. ही झाली गुंतवणूक अर्थात 'इन्व्हेस्टमेन्ट'.
मात्र, गुंतवणुकीमध्ये बचतीत असलेल्या सुरक्षिततेच्या काही भागाचा असलेल्य त्याग करणेही येते. कारण, गुंतवणुकीत जोखीम ( 'रिस्क') येतेच, पण गुंतवलेल्या रकमेवर अधिक उत्पन्न मिळण्याची संधीही असते. वित्तीय सल्लागार याबाबत नेहमीच स्पष्ट सूचना देत असतात.
गुंतवणूक साधनांमध्ये, ज्यात म्युच्युअल फंड, रोखे ('बॉण्ड्स'), शेअर बाजारांत सौदे होणारे कंपन्यांचे शेअर्स आदींचा समावेश होतो, पैसे गुंतविताना जशा उत्तम नफा किंवा उत्पन्न मिळण्याची संधी, शक्यता असते तसेच नुकसान होण्याची जोखीमही असते. याचे कारण या गुंतवणुकीवर मिळणारे उत्पन्न हे वित्तीय बाजारांमध्ये होणारे चढउतार, तेजीमंदीच्या लाटा यावर अवलंबून असते.
सारांश - ( Conclusion )
बचत आणि गुंतवणूक यांच्या व्याख्यांमधील भेद असा आहे. प्रश्न असा उभा राहतो की या दोहोंमध्ये संतुलन कसे साधावे. या प्रश्नाचे उत्तर अगदी सरळ आहे.
आपल्या गरजा नीटपणे लक्षात घेऊन प्राधान्य बचतीलाच द्यावे. म्हणजेच आपल्या अल्पकालीन, दीर्घकालीन गरजांचा अभ्यास, विश्लेषण करून किती बचत करणे आवश्यक आहे, त्यातील किती प्रमाणातील बचत तात्काळ रोखतेच्या ('लिक्विडिटी') स्वरुपात करणे आवश्यक आहे हे निश्चित करूनच बँक बचत खाती, मुदत ठेवी (त्यातही मुदती वेगवेगळ्या) आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पब्लिक प्रॉव्हिडन्ट फन्ड अर्थात 'पीपीएफ') यात एकंदर बचत विभागता येईल.
हे सर्व केल्यानंतर त्या रकमेशिवाय आपले चालू शकते अशी स्थिती असेल तर अशी अतिरिक्त बचत गुंतवणुकीत टाकता येईल, जीमध्ये जोखीमही आहे आणि अधिक उत्पन्न मिळण्याच्या शक्यताही.
ब्लॉग पोस्ट आवडल्यास नक्की लाईक व इतरांनां शेअर करा.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubts, please let me know.